Mumbai Apple Store : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अॅपल आज (18 एप्रिल) मुंबईत (Mumbai) आपले पहिले स्टोअर (Apple Store) सुरु करणार आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक स्वतः सकाळी 11 वाजता याची सुरुवात करतील. अॅपलच्या वेबसाइटनुसार, स्टोअर सोमवारी बंद असेल आणि मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत खुले असेल. यानंतर, दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत (New Delhi) सुरु होईल. Apple ने सोमवारी (17 एप्रिल) सांगितलं की भारतातील पहिले दोन स्टोअर या आठवड्यात उघडतील, हा कंपनीच्या विस्तार योजनेचा एक प्रमुख भाग आहे. मुंबई आणि दिल्लीत अॅपलची दोन दुकाने सुरु होत आहेत.
“अॅपल भारतात 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे आणि या आठवड्यात कंपनी देशातील पहिले अॅपल स्टोअर उघडून मोठ्या विस्तारासाठी तयारी करत आहे,” असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. स्थानिक प्रभावानुसार दोन्ही स्टोअरची रचना करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले की, “भारतात एक सुंदर संस्कृती आणि अविश्वसनीय ऊर्जा आहे. आमच्या ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी, स्थानिक समुदायांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि मानवतेची सेवा करणाऱ्या नवकल्पनांसह एक चांगले भविष्य घडवण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.
दरम्यान 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातून Apple निर्यात 5 अब्ज यूएस डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. हा आकडा भारतात बनवलेल्या फोनच्या एकूण निर्यातीपैकी निम्मा आहे.
बीकेसीमध्ये भारतातील पहिलं अॅपल रिटेल स्टोअर
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअर सुरु होणार आहे. ते 133 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतलं आहे, शिवाय ते 60 महिन्यांसाठी वाढवण्याचा पर्याय आहे. हे अॅपल स्टोअर 20 हजार 806 चौरस फुटांचं आहे, ज्याचे भाडे 42 लाख रुपये प्रति महिना आहे. अॅपलने आतापर्यंत आपली उत्पादनं Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकली आहेत.
टिम कुक भारतात
भारतातील पहिल्या वहिल्या अॅपल स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी अॅपलचे सीईओ टिम कुक सोमवारी (17 एप्रिल) भारतात आले आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अॅपल स्टोअरमध्ये ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी प्रतीक्षा करु शकत नाही, असं ट्वीट स्वत: टिम कुक यांनी केलं आहे. भारतात आल्यानंतर त्यांनी देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांची भेट घेतली. सोबतच रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यानंतर त्यांनी मुंबईतील अनेक उद्योजक आणि सेलिब्रिटींचीही गाठभेट घेतली. आपल्या भारत दौऱ्यात टिम कुक बुधवारी (19 एप्रिल) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट घेणार आहेत.
Hello, Mumbai! We can’t wait to welcome our customers to the new Apple BKC tomorrow. 🇮🇳 pic.twitter.com/9V5074OA8W
— Tim Cook (@tim_cook) April 17, 2023
2017 मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोनची निर्मिती
अॅपल 2017 पासून भारतात आयफोनचे उत्पादन करत आहे आणि त्यामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. रिटेल स्टोअर उघडल्यानंतर, कंपनी आपली पुरवठा साखळी आणखी मजबूत करेल आणि देशभरात आपला व्यवसाय वाढवेल. दरम्यान iPhones सह अॅपल भारतात iPads आणि AirPods देखील उत्पादन करण्याची योजना आखत आहे.
Pingback: Infosys share price इन्फोसिसचा स्टॉक नीचांकी पातळीवर - आपला अभ्यास- Aplaabhyas