गुढी म्हणजे ब्रम्हध्वज, विजयध्वज. गुढी म्हणजे नववर्ष प्रारंभाचे प्रतिक होय. यंदा बुधवार २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा
gudi padwaहा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.
गुढी उभारताना लागणारे साहित्य
पूजा साहीत्य – वेळुची काठी,उटणं, सुगंधीत तेल,हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ,साखरेचे कडे व माळ,तांब्याचा गडू,सुतळी, पाट, रांगोळी,दाराला लाल फुलांसहीत अंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती,नागलीचे पाने,फळे,सुपारी,तांब्या ताम्हण पळी पेला, हार, सुटी फुले.
कडुनिंबाचा प्रसाद- कडुनिंबाची कोवळी पाने,फुले,चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे,हिंग,गुळ
गुढीपाडव्याची पूजाविधी
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही gudipadwa उभारतात. पहाटे सुर्योदयापुर्वी उठावे. अंगाला उटणे व सुगंधीत तेल लावून अभ्यंग स्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे. एका वेळुच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे व काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे,कास्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू, फुलपात्र यापैकी जे आपल्या घरी असेल ते उपडा ठेवावा. गुढीची ‘ऊॅं ब्रह्मध्वजाय नमः’ म्हणून पुजा करावी. कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातुन उजव्या बाजुला दिसेल अशी उभारावी. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढी पाटावर उभी केली जाते. तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. पुरणपोळी, श्रीखंड, दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते. सूर्योदया नंतर ५ ते १० मिनीटात गुढी उभारणे शुभ मानले जाते, तसेच सूर्यास्ता पुर्वी गुढी उतरवणे गरजेचे आहे.
या देवी देवतांचे करावे पूजन
गुढी gudipadwa उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात. रामाचा विजयोत्सव म्हणून श्रीरामाचेही नामस्मरण करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते. यादिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे. महत्त्वाचे शालेय साहित्य, पाटी, वह्या, कोरे पुस्तके यांचे पूजन करावे. शाळेचा पाटीपूजन विधी म्हणजे पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. हळद-कुंकू वाहावे. अक्षता वाहाव्यात. यानंतर फुले अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. धूप-दीप अर्पण करावे. सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा. याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद-कुंकू, फुले वाहावीत आणि नमस्कार करावा.
गुढीपाडवा साजरा करण्यामागे आहे ‘या’ अनेक कथा, सर्वांना माहित असायलाच हव्यात
भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? gudipadwaचैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात? सर्वकाही दडलंय या कथांमध्ये, तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहित असायलाच हव्यात.
शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.
गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती gudipadwaदिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो.
भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.
गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाहि तर तो विजयध्वज देखिल आहे. जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते.
तसेच, असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.
news source Maharashtra Times