Ahmednagar News: शेतकऱ्यांना पाठीच्या फवारणी पंपामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील सीतपुर येथील युवक मयूर गाढवे याने एक इकोफ्रेंडली फवारणी पंप बनवला आहे. विशेष म्हणजे हा फवारणी पंप पाठीवर घेऊन चालण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दिलासा असणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सीतपूर येथील मयूर गाढवे याने पोर्टेबल स्प्रे पंप तयार केला आहे. वडील आणि आजोबा शेतकरी असल्याने शेतात पाठीवरील फवारणी पंपाने फवारणी करताना त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याला पोर्टेबल स्प्रे पंप बनविण्याची कल्पना सुचली. मयुरने पाठीवर न घेता फवारणी पंप चार रबरी चाकांवर कसा बसवता येईल यासाठी एक बेस तयार केला त्यासाठी लागणारे लोखंड हे त्याने भंगारच्या दुकानातून आणले. त्याचा दोन बाय चार फुटाचा बेस तयार करून घेतला. त्यानंतर त्याला चार रबरी चाके बसवले. त्यावर सुरुवातीला लोखंडी टाकी बसवली मात्र त्याचे वजन जास्त होत असल्याने 100 लीटर क्षमतेची प्लास्टिकची टाकी त्यावर बसवली. या पंपांसाठी 12 हॉल्टची मोटार बसवली विशेष म्हणजे ही मोटार सौरऊर्जावर चार्जिंग केली जाते. एक व्यक्ती सहज ओढू शकेल आणि आणि कोणत्याही प्रकारच्या फळबागांमध्ये चालवता येईल अशा पद्धतीचा पंप त्याने बनवला त्यासाठी त्याच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकांचेही त्याला मार्गदर्शन मिळाले.
मयूरचे वडील हे उच्चशिक्षित शेतकरी आहेत. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना शेती व्यवसाय स्वीकारावा लागला. मयूर पोर्टेबल स्प्रे पंपची कल्पना आपल्या वडिलांसमोर मांडली. त्याने मांडलेल्या कल्पनेला त्याच्या वडीलांनी आणि आजोबांनी देखील साथ दिली. विशेष म्हणजे “आविष्कार” या महाविद्यालयातील स्पर्धेत त्याच हे संशोधन राज्यस्तरापर्यंत पोहचलं आहे. सध्या जरी हा पंप ओढण्याचे श्रम शेतकऱ्यांना पडत असले तरी भविष्यात याच पंपांत बदल करून हा पंप रिमोटवर कसा चालेल यासाठी मयूर प्रयत्न करणार आहे. या पंपाला केवळ पाच हजार रुपये खर्च आला असल्याने इतरही शेतकऱ्यांना हा पंप परवडण्यासारखा असल्याचे मयूरचे वडील सुधाकर गाढवे सांगतात.
शेतकऱ्यांना दिलासा
पाठीवरच्या पंपाने शेतकऱ्यांना पाठ दुखीचा तर त्रास होतोच सोबतच फवारणी पंपातील औषध हे पाठीवर सांडल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यातच पाठीवरील पंपची क्षमता 16 लिटर एवढीच असल्याने शेतकऱ्यांना एक स्प्रे घेण्यासाठी शेतात अधिक फेऱ्या माराव्या लागतात. त्यात श्रम अधिक लागतात आणि वेळही जातो. त्यामुळे हा फवारणी पंप शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर आहे असं गावातील शेतकरी सांगतात.
मयूरने बनविलेल्या फवारणी पंपाचे पेटंट आपल्या नावावर केले आहे. त्यामुळे वडील आणि आजोबांचे श्रम कमी करण्याच्या उद्देशाने बनविलेल्या पंपांची जर बाजारात मागणी झाली, तर त्यापासून तो नवीन स्टार्टअप देखील सुरू करू शकतो.