Adani Group Debt: अदानी समूहावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मागील एका वर्षात अदानी समूहावरील (Adani Group) कर्जात मोठी वाढ झाली आहे. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहावरील कर्जात एका वर्षात जवळपास 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये जागतिक बँकिगकडून घेतलेल्या कर्जाचा हिस्सा हा जवळपास एक तृतीयांश झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस अदानी समूहावर जागतिक पातळीवरील बँका, वित्तीय संस्थांचे 29 टक्के कर्ज होते. कर्ज परतफेड करण्यात अदानी समूहाच्या क्षमतेत वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अदानी समूहावर 2.3 लाख कोटींचे कर्ज आहे
31 मार्च 2023 पर्यंत, अदानी समूहाच्या प्रमुख 7 सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज 20.7 टक्क्यांनी वाढून 2.3 लाख कोटी रुपये ( 28 अब्ज डॉलर) झाले आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘ब्लूमबर्ग’ला ही माहिती दिली आहे. अदानी समूहाचे कर्ज 2019 पासून सातत्याने वाढत आहे.
एसबीआयने एवढे कर्ज दिले
अदानी समूहाच्या कर्जामध्ये बाँड्सचा वाटा 39 टक्के आहे. 2016 मध्ये तो 14 टक्के होता. त्याच वेळी, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (SBI Debt to Adani) ने अदानी समूहाला सुमारे 270 अब्ज रुपये (3.3 अब्ज डॉलर) कर्ज दिले आहे. त्याच्या अध्यक्षांनी फेब्रुवारीमध्ये ही माहिती दिली होती.
कर्ज परतफेडीच्या क्षमतेत वाढ
अदानीच्या समूहाच्या कंपन्यांनी मागील काही वर्षात आपले कर्ज फेडण्याच्या क्षमतेत वाढ केली आहे. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये डेट टू रन रेट EBITDA चे प्रमाण 3.2 इतके होते. आकडेवारीनुसार, अदानी समूह आपल्यावरील कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत.
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे 100 अब्ज डॉलरचे नुकसान
गौतम अदानी सर्वेसर्वा असलेल्या अदानी समूहाचा विस्तार वेगाने झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमधील व्यावसायिक हितसंबंधांसह ते जागतिक स्तरावरही आपली छाप सोडत आहेत. एखाद्या उद्योग समूहाची वेगाने वाढ होऊ लागल्यानंतर अनेकांच्या नजरा त्या उद्योग समूहावर पडते. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला याचा सामना करावा लागला. मात्र, अदानी समूहाने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.
या हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या गुंतवणुकदारांनी आपल्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री केली. शेअर्स विक्रीच्या सपाट्यामुळे अदानी समूहाला 100 अब्ज डॉलरचा फटका बसला. अदानी यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेअर्स तारण ठेवून घेतलेले कर्जदेखील त्यांनी मुदतीआधीच फेडले. मात्र, तरीदेखील अदानींच्या शेअर्समध्ये घसरण कायम राहिली.