-
Jalna Water Issue: यावर्षी राज्यातील काही भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणारी पाणी टंचाई (Water Issue) लक्षात घेता प्रशासनाकडून आतापासूनच पाऊलं उचलली जात आहेत. जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या 17 गावातून पाणी उपसा केल्यास कारवाई देखील केली जाणार आहे.
येणाऱ्या काळात होणारी पाणी टंचाई पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यातील 17 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घातला आहे. या गावातून पाणी उपसा केल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात लागणाऱ्या पाण्याचा विचार करुन भूजल विभागाने जिल्ह्यातील काही गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या गावांमध्ये येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अंबड तालुक्यातील 17 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घातला आहे. या सर्व टंचाईग्रस्त गावांत 30 जूनपर्यंत पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार योग्य ती दंडात्मक कारवाईच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना दिल्या आहेत.
या गावांत पाणी उपसा करण्यास बंदी
अंबड तालुक्यातील नागझरी, चिकनगाव, माहेर भायगाव, कर्जत, पाडा, टाका, पारनेर, किनगाव वाडी, लोणार भायगाव, कोंडगाव, ढालसखेडा, खेडगाव, भालगाव, जोगेश्वरवाडी, दुनगाव, रामनगर, बक्षाची वाडी या गावांत पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
बदनापूर तालुक्यातही पाणीटंचाई
दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या माळेगाव, चनेगाव, कंडारी खुर्द, तुपेवाडी या गावांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यातील माळेगावाने प्रस्ताव सादर करुन महिना उलटला, तरी या गावात टँकर सुरु झाले नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे एप्रिलचे आणखी 15 दिवस आणि मे महिना बाकी आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पाणी प्रश्न आणखीच गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Latur Rain : लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वातावरणात गारवा